Pages In This Blog

Wednesday, April 1, 2026

बळवंतराव अर्थात अण्णासाहेब किर्लोस्कर

बेळगावनिवासी अण्णासाहेब किर्लोस्करांचं पायाभूत कार्य लेखक नंदन हेर्लेकर श्री सरस्वती वाचनालय शहापूर-बेळगाव या संस्थेनं नुकतीच १५० वर्षे पूर्ण केली. वाचनालयाच्या कार्यकारी मंडळानं शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना पूर्ण वर्षभर अनेक उपक्रम हाती घेतले. त्यापैकी अत्यंत जिव्हाळ्याचा उपक्रम म्हणजे संगीत शाकुंतल या नाटकाची निर्मिती! या पुरातन वास्तूच्या मूळ जागेत १८७८ मध्ये प्रथम प्रकट झालेल्या या ऐतिहासिक नाटकाद्वारे पहिली ‘एन्ट्री’ नाट्यमहर्षि अण्णासाहेब म्हणजेच बळवंत पांडुरंग किर्लोस्करांनी घेतली. त्याची थोडी माहिती या निमित्तानं आपल्यासमोर मांडण्याची इच्छा आहे. एकेकाळी शहापूरचा भाग पटवर्धनांच्या सांगली संस्थानाच्या अखत्यारीत होता. संस्थानाकरवी अनेक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांना आश्रय दिला जायचा, त्यापैकी हीही एक संस्था होती. शहापुरातल्या बसवण गल्लीतल्या मराठी शाळेतले एक शिक्षक सरंजामे गुरुजी यांच्या वाचनप्रेमी स्वभावामुळे बाजारातल्या मारुती मंदिरासमोरच्या एक इमारतीमध्ये पुस्तकसंग्रह आणि वाचनाची चळवळ सुरु झाली. त्यांच्या पुढाकारानं १८७४ साली तिथं ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ सुरु झाली. केसरी, ज्ञानप्रकाश अशी मराठी तसंच कांही इंग्रजी, हिंदी, कन्नड वृत्तपत्रे, गुरुजींच्या संग्रहातली बरीचशी पुस्तके याच्या बळावर हे वाचनालय ज्ञानसाधनेचं लोकप्रिय ठिकाण बनलं. कोरे गल्लीतल्या वाचनालयाच्या वास्तूच्या निर्माणापूर्वी या जागेत एक बखळ होती. १८७८ साली अण्णासाहेब किर्लोस्करांनी स्थानिक कलाकारांच्या सहाय्याने चार अंकी शाकुंतलचा पहिला प्रयोग या ठिकाणी केला. त्या ऐतिहासिक घटनेची साक्ष म्हणून त्या जागी वाचनालयासाठी सुसज्ज इमारत बांधण्याचं ठरलं आणि सरंजामे गुरुजींच्या पश्चात त्यांच्या निस्वार्थी कार्याला पुढं नेण्यासाठी १९३४ मध्ये एक कार्यकारिणी मंडळ अस्तित्वात आलं. बघता बघता अनेकांच्या मदतीनं भक्कम अशी दगडी इमारत उभी राहिली. मुख्य आश्रयदाते असणाऱ्या सांगली संस्थानिकांच्या राणीसरकारांचं नाव सरस्वती असल्यानं आणि विद्यादेवीच्या नित्यस्मरणाला अनुसरून वाचनालयाचं नाव श्री सरस्वती वाचनालय असं ठेवण्यात आलं. त्या काळातलं बेळगाव मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, बडोदा अशा मोठ्या मराठी नगरां इतकंच अत्यंत महत्वाचं ठिकाण होतं. विद्येचा व्यासंग असणाऱ्या तरुणांच्या आकर्षणाचा हा परिसर होता. १८४३ मध्ये गुर्लहोसूर या छोट्याश्या गावी जन्मलेले बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर या नगराशी संबंध ना ठेवते, तरच आश्चर्य! पंडितकवी मोरोपंत यांच्या घराण्याशी जवळीक असलेलं हे घराणं प्रतिष्ठित होतं. अण्णासाहेबांचे वडील शास्त्रपारंगत, विद्वान आणि संस्कृत पंडित होते. त्यांचा संस्कृत काव्ये आणि नाटके यांचा दांडगा अभ्यास होता. तेच संस्कार अण्णासाहेबांच्या मनावर झाले. वाचनही अफाट असल्यामुळे युवावस्थेतच त्यांना काव्यशास्त्रविनोदाची गोडी लागली. वयाच्या चौदाव्या वर्षीच नाटकं आणि काव्यं रचण्याला त्यांनी सुरुवात केली. कीर्तनकारांना आख्यान रचून देणे, जुन्या कवितांचा, पदांचा संग्रह करणे, हा त्यांचा छंद होता. कन्नड परिसरातला वावर आणि मराठी-संस्कृत अभ्यास यामुळे त्यांच्या साहित्यात बहुश्रुतता आली. १८६३ मध्ये अण्णासाहेब शिक्षणासाठी पुण्यात आले. त्यावेळच्या शिक्षण पद्धतीनुसार त्यांचं शिक्षण ज्युनिअर फर्स्टक्लास पर्यंत झालं. औपचारिक शिक्षण घेण्यात तसा त्यांना फारसा रस नव्हता. परंतु पुण्यातल्या वास्तव्यात त्यांनी गाण्याच्या बैठका, नाटकं पाहणं, त्यातल्या गरजवंताना कविता करून देणं असे त्यांचे उद्योग सुरु झाले. पुणेकर नाटक मंडळीला त्यांनी त्या काळात समुद्रमंथन, अंबा, अंबिका, विक्रमचरित, अशा अनेक आख्यानांवर कविता रचून दिल्या. तिथलं सांस्कृतिक वातावरण पाहून त्यांना आपणही नाटक लिहावं, सादर करावं अशी प्रेरणा मिळायला लागली. समवृत्ती मित्रांच्या समवेत त्यांनी त्याची सुरुवातही केली. परंतु पुण्यात राहून त्यांना ते साध्य होईलसं वाटलं नाही. त्याच काळात म्हणजे १८६७ मध्ये त्यांनी ‘श्री शिवाजी महाराजांचे कार्य’ हा ५०० आर्यांचा ग्रंथ लिहिला. झाले तेवढे शिक्षण पूर्ण करून ते गुर्लहोसुरला परत आले. वकिली करण्याची त्यांची इच्छा होती, पण त्यात यश मिळवण्याची वाट न बघता ते बेळगावला ‘अंग्लो व्हर्नाक्युलर स्कूल’मध्ये शिकवण्याच्या नोकरीला लागले. तिथं असतानासुद्धा त्यांचं नाटकाकडे सातत्यानं लक्ष होतं. बेळगावात आलेल्या नाटक मंडळींचा शोध घेण्याचा त्यांचा उपक्रमही सुरु असायचा. संपर्ककला, रसिकवृत्ती, मनमोकळं बोलणं या स्वभावामुळे ते सर्वाना लगेच आपलेसे वाटत. त्याच सुमाराला म्हणजेच १८७३ मध्ये त्यांनी ‘शांकर दिग्विजय’ हे श्री शंकराचार्यांच्या जीवनावरचं नाटक लिहून प्रसिद्ध केलं. त्या काळातली सर्वात महत्वाची बाब अशी की तेव्हाची नाटके ही काव्याच्या आधारावर सादर होत. पात्रांची संभाषणे त्या त्या वेळी जशी सुचतील तशी असत. नाटककर्त्याचे लिखित संवाद जवळ जवळ नसतच. एकदा झालेलं संभाषण पुढल्या वेळी तसंच होईल याची खात्री त्या पात्रांनाही नसे. त्यामुळे अण्णासाहेबांनी हे नवं नाटक लिहून त्याचा प्रयोग करण्यापूर्वी ‘बेळगाव समाचार’मध्ये “पुस्तकात लिहिल्याप्रमाणे संवाद पात्रे म्हणतील” अशी जाहिरात छापली होती. मराठी रंगभूमीच्या उत्क्रांतीचा हा एक महत्वाचा टप्पा आहे आणि ती किमया अण्णासाहेबांनी बेळगावात घडवून आणली. या नाटकाचे प्रयोग इचलकरंजीकर, कोल्हापूरकर, सांगलीकर मंडळी करत असत. याच काळात ‘अल्लाउद्दीनची चितुरगडावर स्वारी’ हे नाटक अण्णासाहेबांनी लिहिलं. ते शिळाप्रेसवर छापलं होतं. सांगलीकर मंडळी त्याचा प्रयोग करत. आज त्याची संहिता उपलब्ध नाही. बेळगावात अशा प्रकारे अण्णासाहेबांच्या नाट्य चळवळीमधूनच नव्यानव्या कल्पना जन्माला आल्या. त्यांनी ‘भरत शास्त्रोत्तेजक’ या नावाची नाटक कंपनी सुरु केली. या मंडळीने संस्कृत शाकुंतल, विक्रम चरित, मल्हाररावाचे नाटक असे नाट्यप्रयोग केले. कर्नाटकात यक्षगानाप्रमाणे पारिजात या नावाचा एक नाटक प्रकार आहे. तो प्राधान्याने संगीतमय असतो. त्यात कृष्णाच्या जीवनातले प्रसंग आणि नृत्यही असते. अशा प्रकारचं नाटक आपण मराठीत आणावं अशी अण्णासाहेबांची इच्छा होती. त्या दिशेनं त्यांनी प्रयत्न केले, पण ते कांही प्रत्यक्षात उतरलं नाही. परंतु त्या काळात हरिदास आणि नाटक मंडळीना आख्यान रचून द्यायचं त्यांचं कार्य निरंतर सुरु होतं. श्रीकृष्णपारिजात, रासक्रीडा, विक्रमचरित, हरिश्चंद्र, शुकरंभा संवाद अशी आख्याने त्यांनी संगीत नाटक पद्धतीनं लिहिली. ती सुरस, मनोरंजक असून त्यात ओवी अभंगासारखे बाळबोध धावते छंद, चालीवरील गाणी, नाना तऱ्हेच्या राग रागिणी यांचा उपयोग करून ती शक्य तेवढी गेय, आकर्षक केली. श्रीकृष्ण पारिजात मध्ये ललित गद्याचाही वापर त्यांनी केला. किर्लोस्करांच्या या काव्यांना नाट्यकविता किंवा संगीत नाट्यमालिका असं म्हटलं जातं. बेळगावच्या रामतत्व छापखान्यात १८८९ मध्ये हा संग्रह प्रसिद्धही झाला. पौराणिक विषयांवर भर असणाऱ्या अनेक नाटकांची निर्मिती किर्लोस्करांनी त्यावेळी केली. त्याशिवाय गीतलेखन, त्याला आवश्यक संगीत, जनसामान्यांची अभिरुची, नाटक मंडळी, त्यांचे आर्थिक गणित अशा अनेक गोष्टींचा अभ्यास तेव्हा त्यांनी केला. आपल्या कलाजीवनाला पूरक अशी नोकरी पहावी अशा विचारानं त्यांनी शाळेतली नोकरी बदलून पोलीस खात्यात काम करायला सुरुवात केली. तीही बदलून त्यांनी मग रेव्हेन्यू कमिशनरच्या खात्यात १८७८ मध्ये नोकरी मिळवली. त्या आधारे त्यांना आपलं बस्तान पुण्यात बसवणं सोपं झालं. त्याआधी बेळगावात अण्णासाहेबांच्या कंपूमध्ये कृष्णशास्त्री धोपेश्वरकर, अनंत आचमनी अशा नाट्यप्रेमी मंडळींचा समावेश होता. सरस्वती वाचनालयाच्या त्यावेळच्या मोकळ्या जागेत मंटप घालून या सवंगड्यांच्या संगतीनं १८७८ मध्ये अण्णासाहेबांनी शाकुंतलचा पहिला प्रयोग केला. तो प्रयोग प्रारंभावस्थेत होता, परंतु बेळगावकर मंडळीना कांही अद्भुत पहायला मिळालं हे मात्र नक्की! ‘मराठी रंगभूमीचा पूर्वरंग’ या पुस्तकात कृ. बा. मराठे यांनी अशा रंजक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या संग्रहात किर्लोस्कर कंपनीच्या नाटकाची एक जाहिरातही आहे आणि त्यामध्ये किर्लोस्कर संगीत मंडळी, बेळगाव असा उल्लेख आहे. त्याबरोबरच ‘बेळगाव समाचार’ या पत्रामध्ये आलेली जाहिरात सुद्धा वाचण्यासारखी आहे. “भरत शास्त्रोत्तेजक बेळगावकर मंडळी आम्ही सर्व बेळगावकर रसिक जनतेला या जाहिरातीने कळवितो की, वर दिलेल्या नावाची आम्ही मंडळी स्थापन करून पूर्वील कालिदास प्रभृति महान कवींनी केलेल्या नाटकांचे खेळ मराठी तयार करून प्रत्येक इंग्रजी महिन्यात पहिल्या शनिवारी आम्ही करायचे ठरविले आहे. याप्रमाणे पुढील महिन्यात ४ सप्टेंबर शनिवार रोजी रात्री कालिदास कवींनी केलेल्या ‘अभिज्ञान शाकुंतल’चे चार अंक व ‘कच देवयानी’ पूर्वभाग अशी दोन प्रकरणे करणार आहोत. आमच्या पहिल्याच प्रयत्नात सर्वत्रांनी उत्तेजन द्यावे अशी प्रार्थना आहे...म्यानेजर” . याच दरम्यान आणखी एक महत्वाची व्यक्ति अण्णासाहेबांच्या संपर्कात आली आणि ती म्हणजे नाटककार गोविंद बल्लाळ देवल. १८७८ मध्ये ज्या हायस्कूलमधून ते मॅट्रिक पास झाले तिथं अण्णासाहेब किर्लोस्कर शिक्षक होते. त्यांचे काव्यगुण आणि नाट्यगुण हेरून किर्लोस्करांनी देवलांना शकुंतलेची पदे रचण्यासाठी नेमलं. सुरुवातीला शकुंतलेला पदे नव्हती. गुरु-शिष्यांची ही जोडी ‘भरत शास्त्रोत्तेजक मंडळी’त आणि पुढे ‘किर्लोस्कर मंडळी’त पदांसाठी प्रसिद्ध झाली. संगीत शाकुंतल आणि संगीत सौभद्र या दोन्ही नाटकांमधल्या संगीतानं पुढं जो उत्तुंगतेचा इतिहास रचला त्याची ही अत्यंत महत्वाची बाजू लक्षात घेतली पाहिजे. मराठी संगीत नाटकाचा पाया रचणाऱ्या या थोर नाटककाराला या निमित्ते आदरांजली देऊन हे लेखन त्यांच्याच चरणी अर्पण करतो. नंदन हेर्लेकर संदर्भ ‘नाद रंग’ आर्ट्स सर्कल बेळगाव प्रकाशन

No comments:

Post a Comment