Pages In This Blog

Sunday, January 14, 2024

KUMAR GANDHARV

 कुमारांचं पुण्यस्मरण

कुमारांची स्वरसूक्ष्मता
आपल्या संगीतातल्या आनंदरसाची प्रेरणा आपल्या प्राचीन महानुभावांकडून घेतलेल्या कुमार गंधर्वांच्या स्वर सूक्ष्मतेकडे साऱ्या संगीतविश्वाचं ध्यान आकृष्ट झालं. ज्या रागाना आपण साधे सोपे राग मानतो, त्या रागांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी वेगळी होती. त्यांच्या कलासक्त मनात वेरुळचं लेणं पाहूनही स्वरावृत्ती सुचल्या. ‘सिर पे धरे गंगा’ ही शंकरामधली बंदिश त्यांना त्या लेण्यांतूनच सुचली. ते म्हणत, ‘तुम्ही राग केवळ समोरून पाहता. कधी तो उजव्या, डाव्या बाजूनं किंवा पाठीमागून अथवा वरून पाहिलाच नाही.’ त्यांची प्रत्येक कलाकृती अतिशय मोठी होती. रागाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी भावपक्षाकडे अधिक झुकणारी होती आणि म्हणूनच त्याचं गाणं ऐकून भल्याभल्यांची बेचैनी वाढली. जाणकारांना त्यांनी भंडावून सोडलं. पारंपारिक रागाची घसीपीटी बैठक त्यांना कधीच रुचली नाही. ‘काल गायलो ते तेव्हाचं संपलं, आज सगळं पुन्हा शून्यातून सुरु करतोय’ असं ते म्हणायचे. वर्षानुवर्षे जे लोक अभ्यास करतात त्यांना गाता येत नाही आणि जे गातात त्यांना अभ्यास करता येत नाही अशी चाकोरी बाहेरची वाक्यं ते प्रश्नकर्त्याना ऐकवीत. हा तिढा कुमारजीनीच सोडवला. पण त्याचं हे गाणं पचवण्याची ताकद कुणाकडही नव्हती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते शास्त्राच्या मूळ रुपाला मुळीच धक्का लावत नसत. त्यांनी फक्त रुढीचा चोला खरवडून काढला. इतर गायक ते करूही शकले असते, पण रूढीविरुद्ध प्रश्न उभे करणं विनाकारणच अनैतिक मानलं जातं. त्यांना आणि त्यांच्या गायनाला झालेल्या विरोधातून तथाकथित सनातन्यांनी आपल्या आकळतेच्या सीमा सार्वजनिकरित्या दाखवून दिल्या किंवा त्यांनी डोळ्यावर घट्ट पट्ट्या बांधून घेतल्या. परंतु नवरसाच्या पलिकडला आनंदरस कुमारांनी अनुभवला आणि ज्यांना तो भावला ते त्यांच्या स्वरसूक्ष्मतेत विरघळून गेले. परंपरेची चौकट कुमारांनी मोडू नये म्हणून त्यांचे प्रत्यक्ष गुरु देवधरही आग्रही असत. परंतु कुमारांचे विचार त्यांच्यापेक्षाही जास्त आग्रही होते.
ते देवधरांकडे गेले तेव्हा त्या काळात घराण्यांच्या भिंती पोलादी होत्या. देवधरांकडे देशातले सगळे थोर गायक येत. तिथं सगळ्याचं गाणं त्यांना मनमुराद ऐकायला मिळालं. शांतपणे ऐकणं, साठवत जाणं, ऐकलेल्या गाण्याबद्दल विचार मंथन करणं हा त्यांचा सहज स्वभाव असायचा. नंतर प्रौढत्वातली त्यांची प्रगल्भ संगीतविचारधारा पाहता त्या विचार मंथनातून उपजलेलं नवनीत किती पुष्ट आणि सकस होतं, हे समजण श्रवणभक्ती जोपासलेल्या रसिकाच्या क्षमतेचंच मानक ठरलं. संगीत हे परिवर्तनशील आहे. त्याला केवळ साठवून त्याचा प्रवाह थांबवू नये असे ते म्हणत. आजचं झालं, पुढं काय? असा सातत्याचा सांगीतिक विचार ते प्रत्येकवेळी श्रोत्यांसमोर आपल्या गायनातून श्रोत्यांसमोर ठेवत. त्यांची पूर्ण मैफल ऐकून झाल्यावरही सच्चा रसिकाला कुतूहलयुक्त बेचैनी सातत्यानं जाणवत राहायची. जे ऐकलं त्यात पूर्तता झालीच नाही असं सर्वाना वाटत राही. या संदर्भात त्यांच्या या ओळी खूपच अंतर्मुख करतात.
मैं था जिसके पीछे पीछे
अब मै उसके आगे आगे
देखा जब मै आगे पीछे
दिखा सबकुछ आगे आगे


(Google Image)



प्रबंध गायनापासून ख्याल गायनापर्यंत अनेक टप्पे संगीत कलेने आजवर ओलांडलेले असतांना घरांदाजीचा डामडौल कशाला? असे बचैन करणारे प्रश्न त्यांनी सतत प्रवाही असलेल्या गाण्यातून वेळोवेळी प्रकट केले.
पारंपारिक ख्याल त्यांना उपजतच अवगत होता आणि म्हणूनच ते वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी भूगंधर्व रहिमत खानसाहेबांची सव्वातीन मिनिटाची ध्वनिमुद्रिका तशीच गाऊन, पुढं त्या हृदयी जाऊन अर्धा तास गाऊन दाखवत असत. अतिविलंबित लयीचा ख्यालही त्यांनी मध्यलयीत आणला हा केवळ त्यांच्या शारीरिक अडचणीमुळे नव्हे. कुमारांचा स्वर लावण्य म्हणजे एक प्रयोशाळा होती. ‘जमुना के तीर’ ची करुणावली त्यांनी आनंदरसात परिवर्तित केली आणि त्या मूळ पाच मिनिटाचा परमोत्कट बिंदू अर्ध्या तासापर्यंत सर्वांना स्पर्शू दिला. त्याचं बालपण म्हणजे एक मोठं आश्चर्य होतं. त्या वयातलं त्याचं ऐकणं, तरल मनाच्या कप्प्यात साठवून ठेवणं, साठवून ठेवलेल्या त्या स्वरखजिन्याला आपल्या विचार शक्तीनं संस्कारित करणं आणि ते श्रोत्यांसमोर व्यक्त करताना संपूर्ण नवं रूप बाहेर आणणं हे त्याचं आगळेपण होतं. शब्दाचं संगीत जिथं थांबतं तिथं तराना सुरु होतो असं ते म्हणत. म्हणूनच तराना हा ठुमरीच्या भावविश्वाचा पुढचा पदर आहे असं त्यांचं प्रात्यक्षिकातून दाखवून दिलेलं मत होतं.
कुमार या पुस्तकाचे लेखक वसंत पोतदार यांच्या वाक्यात सांगायचं झालं तर इतर गायक तेच ते राग, रागच नव्हे, त्यांच्या त्याच त्या बंदिशी वर्षानुवर्षं एकसारख्याच पेश करत आले आहेत आणि कुमारजी नित्यनूतन, टवटवीत अशी स्वरसुगंधित फुलांची परडी श्रोत्यांना देत आले आहेत.
तसं पाहता त्यांचं आयुष्य इतर मंचासीन कलाकारांपेक्षा खूपच कमी होतं. आजारपणातली त्यांची पाचसहा वर्षं लो कधुनिंच्या श्रवणात आणि चिंतनात गेली. पुढं गायची परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी गायलेल्या वर्षांचा कालखंड हा गुणात्मक दृष्ट्या सर्व प्रस्थापितांपेक्षा वरचढ ठरला.
उ. अल्लादिया खांसाहेबांना सूर्याची उपमा दिली जायची, पण तो एक काळ असा होता की एकाचवेळी असे अनेक संगीतसूर्य भारताच्या संगीताकाशात स्वच्छंद विहार करत होते. त्यांचे स्वरामृत प्राशून कुमारांसारख्या दिव्यस्पर्शी स्वरादूताना ती प्रखरता तळपत ठेवली. ते म्हणत, ‘राग अरूप असतो, त्याला बंदिशीचं कुंची अंगड पहरवावं लागतं. त्यांच्या डोळ्यासमोर राग, त्याचे स्वर आणि त्याची बंदिश साक्षात उभीच राहायची. स्वराइतकंच त्यांनी निसर्गावर प्रेम केलं. शिल्पकलेवर केलं, रंगावर केलं. इतकंच नव्हे तर जो समोर आला त्या कवीच्या शब्दांवरही केलं.
तुलसीदासांच्या रचना गाण्यासाठी त्यांनी अख्खा तुलसीदास वाचून काढला. तीच गोष्ट कबीराची, मीरेचीही. कवीचं अंतरंग समजून घेण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. कन्नड मातृभाषा असलेल्या या अवलियानं भा. रा. तांबे या कवीवरही विलक्षण प्रेम केलं. तुकारामांचं दर्शनही घडवलं. शाळेचं नाममात्र शिक्षण घेतलेल्या कुमारांनी साहित्यिक ज्ञान मोठ्या हौसेनं मिळवलं. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडं विचार करण्याची त्यांची नैसर्गिक सुंदरता होती.
बालगंधर्व उमजून घेण्यासाठी त्यांच्या ध्वनिमुद्रिका घासून घासून पार खराब होईपर्यंत ऐकल्या. त्यांच्या तनाइति समजून घेण्यासाठी ध्वनिमुद्रिकांची गति कमी करून सूक्ष्मतेनं ऐकल्या. श्रेष्ठांच श्रेष्ठत्व नेमकं काय असतं याचा शोध घेण्याची त्यांची धडपड आज प्रत्येकानं समजून घेण्याची फार आवश्यकता आहे.
वेगवेगळ्या घराण्यात भूप कसा वेगळा भासतो हे सांगण्यासाठी त्यांनी भूप दर्शन हा कार्यक्रम सदर केला. तीच गोष्ट गौडमल्हार यासारख्या अनेक रागांसाठी त्यांनी केली. गीत हेमंत, गीत वर्षा, गीत बसंत असे त्यांचे प्रयोग जाणीवपूर्वक तयार केले गेले. स्वरसंहिता ऋतुकालाप्रमाणे कशी सहजतेनं बदलते याचं दर्शन ते या कार्यक्रमातून देत. अभ्यासू श्रोत्यानं काय, किती आणि कसं ऐकावं याचा वस्तुपाठ अशा कार्यक्रम करण्यामागं त्यांचा असे. एका रंगात दुसरा रंग सहजपणे मिसळून नवसुखदायक स्वरूप प्रकट करतो तसं सगळ्या ललितकला एकमेकांच्या हाती हात देऊन विहार करतात हे त्यांच्या या प्रयोगांतून सिद्ध व्हायचं.
‘मालवा की लोकधुने’ हा तरी त्यांच्या गंभीर अस्वास्थ्यामधला नित्य अवलोकानामधून उद्भवलेला चिंतनाचा विषय. तो कार्यक्रम १९७० मधला. त्या मनस्वी काळात कुमारांच्या मनातली धून उगम रागांची, कित्येक वर्षांपासूनच्या विचारांची उजळणी सुरु झाली. देवधरांनी त्यांना धून उगम रागांबद्दल अगोदर सविस्तर सांगितलं होतंच!
त्रिवेणी हा त्यांचा कार्यक्रम १९६७ मध्ये मंचावर आला. त्यात कबीर, मीरा आणि सूरदास यांच्या पदांचे त्यांनी केलेलं गायन आणि संगीत संयोजन होतं. काही श्रोत्यांच्या मते तो एक प्रयोग होता. पण कुमारजी म्हणत, हा प्रयोग नव्हे, उत्खनन आहे.! सांगीतिक उत्खनन. विस्मृतीच्या पाताळात गडप झालेली स्वरमूल्य मी पुनरपि जन्माला घातलीत, घालत राहणार आहे.
त्यांच्या आजारपणानंतरचं गाणं प्रथम इंदूर, उज्जैन आणि नंतर १९५३ मध्ये पुण्याला झालं. नवचेतनेची ज्वाला अंतरात घेऊन पूर्णपणे नव्या पेहरावातल त्याचं ते गायन ऐकून पुराणमतवादी शास्त्रच्छलाचा आरोप करू लागले. चतुरस्र संगीतकारही चक्रावून गेले. गोविंदराव टेंबे तरी म्हणाले, कुमार गांधर्व हे भारतीय शास्त्रीय संगीतासमक्ष उभे ठाकलेलं एक प्रश्नचिन्ह आहे. पण त्याच गोविंदरावाना वर्षभरात आपलं ते वाक्य बदलून कुमारांना ‘भारतीय संगीतातलं एक आश्चर्य’ असं करावं लागलं!
कुमार म्हणत, एकचवेळी दोन आघाड्यावर मला रस्सीखेच करावी लागते आहे. एका आघाडीवर क्षयरोग, तर दुसरीकडे मीच पूर्वी गात असलेली पारंपारिक गायकी. ती व्याकरणात जखडली होती, तिच्याबरोबर मीही. त्यातून मुक्त झालोय, तीच ही नवी गायकी!
ठुमरी, टप्पा, तराना यावरचं त्याचं विचारदर्शन १९६९ मध्ये त्यांच्या उपजत जिज्ञासू स्वभावातून श्रोत्यांसमोर प्रकटलं. ठुमरीच्या उगमाबद्दल आणि त्यातल्या मनोभावी प्रकारांबद्दल त्यांनी केव्हा अभ्यास केला असेल हे कळणंही दुरापास्त आहे. दत्तात्रयांनी एकवीस गुरु केले असं म्हणतात, पण या अवलियानं पशुपक्षी, खळखळता निर्झर, गहन सागर, निळा अंबर, झुळझुळता वारा, कोसळत्या धारा, हिरवी वनराई, गर्द मेघांचा कडकडाट, तुफानी वादळ या सर्वांनाच स्वरारोपणासाठी आदर्श मानलं.
तसे त्यांचे गुरु होते तरी कोण?
त्यांचे वडील सिद्धरामय्या हे अब्दुल करीम खांसाहेबांच्या गायनावर निरतिशय प्रेम करणारं व्यक्तिमत्व होतं. गदगच्या गानयोगी पंचाक्षरी गवयांचे ते शिष्यही होते. वडील बंधु शिवरुद्रय्या हेही गात. त्या उभयतांच गाणं त्यांनी बालवयात ऐकलं. मामा दर्जेदार चित्रकार आणि मूर्तिकार होते. म्हणजेच कलेचा तरल स्पर्श त्यांच्या बालवयातच त्यांना झाला. सिद्धरामय्या आणि शिवरुद्रय्या जेव्हा गायला बसत तेव्हा पाच सहा वर्षांच्या कुमारांनी ‘सा’ लावला आणि उभयतांची गायनकलाच झाकोळली गेली. ईश्वरी दयेचा खूप मोठा वरदहस्त या बालकाच्या रुपात आपल्याला गवसला आहे हे त्या दोघानाही जाणवलं. लोकांनातरी हा एक मोठा चमत्कार असल्याची जाणीव झाली. छोट्या कुमारांना घेऊन उभयता आपल्या घराण्याच्या अध्यात्मिक गुरूंच्या दर्शनाला बागेवाडी येथे शांतवीर स्वामी यांच्याकडे गेले. या बालकाचं ते अलौकिक आणि सर्व रसानी युक्त असं बेधडक गायन ऐकताच त्यांनी या बालकाचा भारावून जाऊन सत्कार केला आणि ‘कुमार गंधर्व’ अशी अक्षरं कोरलेलं सुवर्णपदक बक्षीस दिलं. तो आशीर्वाद प्राप्त झाल्यावर त्यांच्या वडिलांनी ‘कुमार गांधर्व आणि पार्टी’ या नावानं गायनाच्या कार्यक्रमाचा धडाका सुरु केला. जिथं जिथं ही पार्टी पोहोचली तिथं तिथं श्रोत्यांना दैवी, विलक्षण, चमत्कार, अपूर्व, पूर्वसंचीत धन अशा विशेषणाची पराकाष्ठा पहायला मिळाली. संपूर्ण देशात अगदी लाहोर पेशावर पर्यंत त्यांचे अथक दौरे सुरु झाले. कार्यक्रमाच्या आरंभी शिवरुद्रय्या थोडावेळ गात आणि मग कुमारांची स्वरगंगा उसळू लागे. श्रोते स्थलकाल विसरून गुंग होऊन जात. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांची दुर्गा रागातली ‘सखी मोरी रुमझुम’ ही बंदिश आणि ‘श्याम सुंदर मदन मोहन’ ही भैरवीत गायलेली तबकडी प्रसिद्ध झाली. ती ऐकून देशभरातल्या गायनप्रेमींच कुतुहूल चाळवलं. अलाहाबाद, कलकत्ता आणि मुंबईच्या संगीत विश्वात कुमारांनी खळबळ उडवून दिली. त्या काळात बेळगावात असलेले महबूब खां आणि कुमारांचे समवयीन रामकृष्ण बोंद्रे तबल्याच्या साथीला असत. १९३१ ते १९३५ पर्यंत संपूर्ण देशातल्या महत्वपूर्ण संगीत समारोहात या चौकडीनं सहभाग घेतला. प्रयाग संगीत समितीच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत शंकर राव बोडस, फैय्याज खान, कुंदनलाल सैगल अशांच्या उपस्थितीत कुमारांनी ‘उगिच का कांता’ हे पद गायला सुरुवात केली. करीम खांसाहेबांची ही तबकडी नुकतीच बाजारात आली होती आणि तिला अमाप लोकप्रियता लाभलेली होती. खांसाहेबांच्या भावगर्भ परिसीमा ओलांडुन विलक्षण आत्मविश्वासानं कुमारांचं झालेलं गाणं ऐकून सारेच फिदा झाले. खुद्द फैय्याजखां उठून मंचावर आले आणि म्हणाले की ‘बेटा, अगर मैं जमीनदार होता तो मेरी सारी जायदाद तुम्हारे नाम कर देता’. कन्नड सोडून कोणतीही भाषा अवगत नसलेल्या कुमारांना त्यातलं काही कळल नाही, पण इतक्या मोठ्या गवय्यानं आपल्या मुलाचं केलेलं कौतुक पाहून सिद्धरामय्या गहिवरले..
पुढं कलाकत्त्यामध्ये विद्यापीठाच्या आवारात झालेल्या समारोहात बंगालातले महान संगीतकार, गायक, वादक, संगीतशास्त्री उपस्थित होते. सभाधीटपणे मंचासीन झालेल्या कुमारांनी करीम खांसाहेबांच्याच प्रसिद्ध तबकडीतला झिंजोटी गायला सुरुवात केली आणि श्रोते अवाक झाले. कुमारांवर बक्षिसांची खैरात झाली. त्याच श्रोत्यामध्ये एक महान गुरुही बसलेले होते. मुंबईचे प्रो. बी. आर. देवधर. १९३५ मध्ये मुंबईच्या जीना हाल मध्ये होणार असलेल्या या परिषदेचे ते सूत्रधार म्हणून ठरले होते. त्यांनी प्रभावित होऊन कुमारांना तिथं येण्याचं रीतसर आमंत्रण दिलं. तिथंही अनेक खांसाहेब, पंडित, मीमांसक, रसिक आणि उत्सुक दर्दी श्रोत्यांनी कुमारांचं अभूतपूर्व गायन ऐकलं. परत तिथच आणखी एका परिषदेमध्ये तीनच महिन्यांनी त्याचं गायन झालं.
सिद्धरामय्यांनी आता ठरवलं की बस्स झालं. देवधरांनी पूर्वी विषय काढला होताच. त्याप्रमाणे त्यांच्याकडं कुमारांना सुपूर्द करायचं नक्की ठरलं. या ठिकाणी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की सोन्याची अंडी देणारा आपला पुत्र गुरूगृही ठेवायचा म्हणजे खूप मोठ्या मायेचा करायला हवा! हा विचार सिद्धरामय्यांनी किती विचारपूर्वक केला असला पाहिजे. त्याप्रमाणे झालंही! देवधरांनी कुमारांचे सगळे दौरे बंद केले. आपल्या घरच्या सदस्याप्रमाणे त्यांच्यावर जीव लावला. त्यांचा अल्लडपणा, हूडपणा, हट्टीपणा सगळं काही सहन केलं. आपल्या पत्नीकरवी त्यांना लिहायला, वाचायला शिकवलं. चीजांच नोटेशन कसं करावं याची वेगळी शिकवणी घेतली. आजवर कुमार तीनताल, झपताल, दादरा, कहारवा अशा तालातच गायचे, आता त्यांचा विलंबित तालातील ख्यालांचा प्रशिक्षणाचा अभ्यास सुरु झाला. अनुकरणाचं त्याचं गाणं आता नोटेशनच्या शिक्षणामुळे अधिक समजूतदार बनू लागलं.
हर्षे आणि आठवले हे दोन शिक्षकही त्यांना शिकवू लागले. कुमारांसाहित चंद्रशेखर रेळे, शीला पंडित आणि कांचनमाला शिरोडकर अशा चारजणांचा विद्यार्थीवर्ग त्यांच्याकडे शिकू लागला. देवधरांच्या तालमीत अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या कुमारांना त्यात विशेष कष्टही घ्यावे लागले नाहीत. १९३८ मध्ये महान तबलावादक अहमदजान थिरकवा यांनी अलाहाबादमध्ये कुमारांची साथ केली त्या प्रगल्भ गायकीच्या अवेगावर फिदा होऊनच! देवधरांकडून त्यांना अनेक अनवट राग, अनवट बंदिशी यांचा भारंभार खजिना मिळाला. देवधर एकदा गायलेला राग अथवा बंदिश आकाशवाणीवर पुनश्च कधीही गात नसत. कुमारांना उत्तर भारतातली आकाशवाणीची चेन बुकिंग्ज ते मिळवून द्यायचे. याचं कारण कुमारांना राजाभैया पुंछवाले आणि अण्णा रातंजनकरना भेटता यावं. त्यांच्याकडं बसून शिकायला मिळावं. कुमारजी रातंजनकरांकडे खूप शिकले. जसे रातंजनकर, तसे जगन्नाथबुवा पुरोहित. नव्या चीजा बांधल्या की कुमारांना लगेच बुवांचा निरोप यायचा. कितीतरी बंदिशी कुमारांना बुवांनी शिकवल्या.
पुढं आठवले यांचे भाचे बंडू ऊर्फ व्ही. जी. जोग, हर्डीकर, बेळगावचेच बसवाणेप्पा भेन्डीगेरी, रामकृष्ण बोंद्रे, शांताराम कशाळकर, तुलसीदास शर्मा असे अनेक सहाध्यायी त्यांना तिथंच मिळाले. १९४६ मध्ये पंढरीनाथ कोल्हापुरे हे कुमारांचे शिष्य बनले. देवधरांनी कुमारांना शिक्षकाचंही काम दिलं होतं.
देवासचे कृष्णराव मुजुमदार देवधारांकडे नित्य येत. कुमार त्यांच्यापाशीही शिकले. निकोपपणे धक्केबाजी न करता सम कशी साधावी याचं गुपित ते सिंदेखां यांच्याकडे शिकले. लगनपिया या नावाने प्रसिद्ध वाजीद हुसेन यांच्याकडून ते टप्प्याची गायकी शिकले. राजाभैय्या पुंछवाले यांच्याकडून त्यांनी टप्प्याची ग्वाल्हेरी गायकी आत्मसात केली. अंजनीबाई मालपेकर यांच्याकडून कुमारजी स्वरांचं स्वयंभूत्व आणि ख्यालभरणा शिकले.
वसंत पोतदारांशी बोलताना कुमारांनी आपल्या शेवटच्या गुरुचंही नाव सांगितलं आणि तो गुरु म्हणजे टी. बी.!! त्या गुरुनं तरी कुमारांना गाण्याबाहेरच घालवलं. म्हणजेच फार शिकवलं!
स्वतः अंतर्मुख होऊन आपल्याला भावलेल्या विचारसरणीतून उत्पन्न झालेल्या अनेक नव्या रागांची निर्मिती त्यांनी केली. मालवती, अहिमोहिनी, गौरीबसंत, लंकेश्री, लगनगांधार, संजारी, मधसुरजा, निन्दियारी, सहेली तोडी, भवमत भैरव, चैती भूप, दुर्गा केदार, नंद केदार, सोहनी भटियार आणि गांधी मल्हार असे अनेक राग ऐकताना आजही श्रोता अचंबित होतो. असीम शास्त्रीय संगीताच्या नवनवीन द्वारांची त्यांनी केलेली शोधप्रक्रियासुद्धा अचंबित करणारी आहे. कुमारांची ग्रंथरचनाही उल्लेखनीय आहे. अनुप राग विलास हा त्यांच्या बंदिशींचा संग्रह एक अनमोल खजिना आहे.
अरविंद मंगरूळकरांनी संस्कृतमध्ये कुमारांवर लिहिलेलं काव्य इथ देण्याचा मोह आवरत नाही. त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेल्या ओळी खरोखरीच असामान्य वर्णनानं युक्त आहेत.
कौमारं गान्धर्वम्
स्निग्धा, श्यामा, फुल्ला विपिने लीला गगने महोत्सवाभा
संविदि भान्ती तमसि लसंती ददाति मोद दधति मोहम्
अविरतमात्मनिलीना स्तब्धा काऽहं काऽहं इति पृच्छन्ति
साऽहं साऽहं समीरयन्ती परमे व्योमन विरलं द्रष्टा
चरमे विश्वे विरलं स्पृष्टा तदापि प्रतीतिविश्वे मग्ना
निमिषे निमिषे नवतारूढा दृष्ट दृष्ट क्वापि व्यक्ता
आकलनीया नो कलनीया
सा किं राधा, स्निग्धा मधुरा? नहि, नहि
मालवरात्रि;, श्यामा शीता? नहि, नहि
अपि वनलक्ष्मी: फ़ुल्लाविपिने? नहि, नहि
तत् किं ज्योत्स्ना, लीला गगने? नहि, नहि
आर्य सा विद्युत् तमसि लसन्ति? नहि, नहि
सा किमुपनिषद, अमृतं यान्ती? नहि, नहि
तत् किं प्रतिभा नवतारूढा? नहि, नहि
अपि सा यक्षी व्यक्ताव्यक्ता? नहि, नहि
बन्धो, सत्यं ह्येतत्सर्वं तदपि दशाङ्गुलमस्यात् पारे
सा खलु गानकला कौमारी कौमारं गान्धर्वंम्
ही कविता त्यांनी नोव्हेंबर १९८५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘आमचे कुमारजी’ या संग्रहात प्रकाशित केली आहे. (आमचे सन्मित्र नंदन वांद्रे यांच्याकडून उपलब्ध झाली). या लेखातील अनेक उद्धरणे विचारवंत डॉ. मुकुंद संगोराम यांच्या व्याख्यानातून आणि वसंत पोतदार यांनी लिहिलेल्या ‘कुमार’ या पुस्तकातून घेतली आहेत.

नंदन हेर्लेकर