शास्त्रीय संगीत काल, आज आणि उद्या
हिंदुस्तानी
शास्त्रीय संगीताबद्दल बोलत असताना वरील वाक्याचा नेहमीच उपयोग होत आला आहे. या
विचारामागे अनेकजणांची प्रतिक्रिया चिंतादर्शक स्वरूपाचीच असते. या अनेकजणात
संगीताचे खरे रसिक असतात, कलाकार असतात,
कलेचे जाणकार आणि अभ्यासकही असतात. शिवाय त्यांनी संगीताचा सुवर्णकाळ पाहिलेला
असतो. संगीतकलेतील महान उपासकांचे जीवन, त्यांची जडण घडण
आणि उत्कर्ष त्यांनी पाहिलेला असतो. अर्थात यातली श्रीमंती दर पिढीनंतर बदलत असते.
त्यातले आदर्श बदलत जातात. महानतेचे मानदंड सुद्धा बदलत जातात. परंतु कलेचे असामान्यत्व
जाणणारे असे या समूहातले लोक असतात. आज ज्यांची नावे या क्षेत्रात उत्तुंगतेच्या
शिखरावर आहेत त्यांचे गुरुजन अशा लोकांच्या स्मरणात असतात.
तसे पाहता असे वाक्य
उच्चारून सामान्य लोकांसमोर संगीत सृष्टीचे एक वेगळे चित्र उभे करण्याचा प्रयत्न
करणारेही लोक अधिक असतात. अशा लोकांसमोर केवळ त्यांच्या पिढीतल्या श्रेष्ठ
कलाकारांची नावे असतात. परंतु अशा लोकांचे शास्त्रीय संगीताचे ज्ञान वाखणण्यासारखे
असते असेही नाही. यामध्ये तथाकथित समाजसेवक, आश्रयदाते, लेखक,
पत्रकार, विविध पक्षनेते,
पुढारी वगैरे लोक असतात, ज्यांना निरनिराळ्या प्रसंगी जाहीर
वक्तव्य करावे लागते. अशा लोकांच्या संभाषणामध्ये हा विषय प्राधान्यतेने येत असतो.
याचा अर्थ ही त्यांची मते अधिकृत किंवा अभ्यासपूर्ण असतात असेही मानण्याचे कारण
नाही.
संगीताच्या
अभ्यासकाला हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्याच्यासमोर आपण स्वतः केलेल्या
अभ्यासाचा, महान गुरूंकडून अथकपणे मिळवलेल्या
ज्ञानसंपदेचा, अन्य सहकारी कलाकारांनी घेतलेल्या
मेहनतीचा, मिळालेल्या मार्गदर्शनाचा,
त्याचप्रमाणे या सर्वांच्या आदर्श गुरुजनांच्या विद्वत्तेचा दृष्टीकोण असतो.
एखाद्या रागाचा सर्वांगीण विस्तार करत असताना या विद्वान कलाकारांनी त्याकडे किती
विशाल दृष्टी ठेवून पाहिले आणि त्या प्रत्येकाच्या नजरेमध्ये किती विविधता होती हे
सर्व या अभ्यासकाच्या डोळ्यासमोर तरळून जाते. जसे कुमारजी म्हणत,
रागाकडे समोरून, पाठीमागून, डावीकडून,
उजवीकडून एवढेच काय तर वरूनसुद्धा पाहता आले पाहिजे. एकाच प्रकारे गायन करणे हा
केवळ पीठ दळण्याचा प्रकार आहे. याला परंपरा, घराणे जपणे वगैरे
म्हणत असतील तर ती एक भली मोठी चूक आहे.
अर्थात कुमारजी हे
अत्यंत वेगळा विचार घेऊन श्रोत्यांसमोर आलेले सतत चिंतनशील असे गायक होते. इतरांना
त्यांच्या त्या मनोवृत्तीशी जोडता कामा नये. किंबहुना आपल्या शिष्यांनी
आपल्यासारखेच गावे, आपलेही घराणे निर्माण व्हावे अशी त्यांची
मुळीच अपेक्षा नव्हती. उलट याच गोष्टीची त्यांना घृणा होती.
कुमारजींच्या
उदाहरणावरून इथे एवढेच सांगायचे आहे की घराणे आणि परंपरेच्या पिढीजात साखळीने अनेक
शतके कित्येक पठडया जोपासल्या गेल्या. त्या प्रत्येकाच्या नजरेच्या स्वातंत्र्याने
सुंदरतेचे वेगवेगळे परिमाण जोपासले जाऊन सुसंस्कृत समाजाची ओळख निर्माण झाली.
प्रत्येक घराण्यागणिक शेकडो गुणी कलाकार होऊन गेले आणि शिष्यांची अतूट शृंखला
निर्माण झाली. त्यातून उत्तमतेची श्रवणकलासुद्धा विकास पावली. संगीताचे शास्त्र
लोकांना कळू लागले, त्याशिवाय संगीताचे सौंदर्यशास्त्रसुद्धा
निर्माण झाले. संगीत कसे ऐकावे याचाही विचार पुढे आला. सर्वात महत्वाचे म्हणजे
संगीतकलेपासून होणारे शारीरिक, मानसिक फायदे या
गोष्टींचाही ऊहापोह सुरू झाला. उत्तम संगीतामुळे मनुष्यासह प्राणी, वनस्पती
आणि सामाजिक समूहजीवनावर होणार्या सुपरिणामांचेही शास्त्र पुढे आले.
आजचे शास्त्रीय
संगीत हे अशा रीतीने शास्त्रीय (सायंटिफिक) विचार करणार्या, संगणकीय मेंदूने विचार करणार्या पिढीचे आहे. ह्या दृष्टीने
विचार केला तर उद्याचे संगीत हे डिजिटल युगाला शोभणारे आणि नव्या उपकरणांचे सहाय्य
घेऊन आपल्या ज्ञानाचा विकास करू पाहणार्यांचे आहे. यात अनवट वयातल्या मुलांनी जुनाट
ख्यालाची नवी तंत्रे शोधून बुजुर्ग घरंदाज कलाकारांना नवे पाठ दिले तर काही आश्चर्य
वाटायला नको.
नंदन हेर्लेकर