Pages In This Blog

Sunday, September 11, 2022

सतत प्रवाही संगीत

 

सतत प्रवाही संगीत

 

जपकोटि गुणं ध्यानं ध्यानकोटि गुणं लय:|

लयकोटि गुणं ज्ञानं गानात् परतरं नहि ||  

 

जपाहून ध्यान कोटिगुण श्रेष्ठ, ध्यानाहून लय कोटिगुण श्रेष्ठ आणि लयापेक्षा गान कोटिगुण श्रेष्ठ आहे असे एका प्राचीन श्लोकात म्हटलं आहे.

 

आपलं संगीत ठराविक काळानंतर अनेक प्रकारे बदलत गेलेलं आहे. संगीत प्रवाही असतं असं म्हणतात ते एवढ्यासाठीच. नाहीतर साचलेल्या पाण्याप्रमाणे त्यात गढूळपणा येणारच.

 

पूर्वी तीन सप्तकांना ग्राम  म्हणायचे. म्हणजेच मंद्र सप्तकाला उदारा, मध्य सप्तकाला मुदारा आणि तार सप्तकाला तारा अशी नवे होती. त्यांची नावेही उदार ग्राम, मुदार ग्राम आणि तार ग्राम अशी होती.

 

शुद्ध स्वरातल्या भेदांमुळे विकृत स्वर निर्माण झाले हे आजच्या शास्त्राप्रमाणे ही बरोबर आहे. पूर्वी या स्वरांना प्रकृति स्वर असं म्हटलं जायचं आणि त्यात झालेल्या भेदांमुळे विकृत स्वर निर्माण झाले असं होतं. म्हणजेच आज आपण ज्यांना शुद्ध आणि विकृत स्वर म्हणतो तेच प्रकृत आणि विकृत स्वर आहेत.

 

आणखी एक जुना शब्दप्रयोग आरोह अवरोहाबद्दलचा आहे. स्वर चढवीत जाणे म्हणजेच आरोह. याला पूर्वी अनुलोम म्हटलं जाई. तसच अवरोहणाला विलोम हे नाव होतं.

 

तीनतालाच्या सोळा मात्रा, कहरव्याच्या चार, रुपकच्या सात अशाप्रकारे मात्रांचा विचार केला जातो. अशी सरसकट ‘सरळ’ मोजण्याची पद्धत पूर्वी नव्हती. मात्रा  चार पद्धतीच्या होत्या. १. ह्रस्व, २. दीर्घ, ३. प्लुत आणि ४. अणु. यातली ह्रस्व एक मात्रा, दीर्घ दोन मात्रा, साडेतीन मात्रांचा प्लुत आणि अर्ध्या मात्रेचा अणु असं गणित होतं. ते हिशेब लिहिण्याची खास चिन्हेही होती.

 

 

 

आज शास्त्रीय संगीताचा आधार म्हणजेच दहा थाट. या दहा थाटामध्येच सर्वच्या सर्व प्रचलित रागांची विभागणी करण्यात आली आहे. हे दहा थाट पं. विष्णु नारायण भातखंडे यांच्या आधुनिक संगीतशास्त्रपद्धतीमधून निर्माण झाले. त्यापूर्वीही कर्नाटक संगीतातल्या बहात्तर मेलांचा (आजही तो तिथे आहेच) प्रभाव होता. या रागविभागणीच्याही पूर्वी काय होतं बरं?

 

तेव्हा  होते षट्पुरुष राग, त्यांच्या अंगना, पुत्रराग,, रागिण्या वगैरे! मूळ सहा रागांपासून इतर रागांची उत्पत्ति झाली असं तेव्हाचं शास्त्र होतं. आता पाहू ते मूळ सहा राग कोणते होते.

     भैरव, २. मेघ ३. पंचम, ४. श्री, ५. नटनारायण आणि ६. बसंत (यातच मालकंस अथवा हिंडोलही होता) अत्यंत महत्वाचं म्हणजे हे राग अनुक्रमे ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत ऋतूमध्ये गायले जात. रागाच्या स्त्रिया कोणत्या ते आता  पाहूया.

 

भैरव रागाच्या अंगना – भैरवी, बंगाली, सैन्धवी, रामकिरी (रामकली किंवा रामक्री), गुर्जरी, गुणकिरी (गुणकली किंवा गुणक्री)

 

मेघ रागाच्या अंगना – मल्हारी (मल्हार), सोरटी (सोरठ), सावेरी, कौशिकी, गांधारी, हारश्रुंगार

 

पंचम रागाच्या अंगना – विहागा, भूपाली, करणाटी, पटहंसिका, मालवी, पटमंजरी

 

श्री रागाच्या अंगना – मालश्री (मालसिरी), त्रिवेणी, गौरी, केदार, मधुमाधवी, पहाडी

नटनारायण रागाच्या अंगना  – कामोदी, कल्याणी, आभिरी, नाटिका, सारंगी (सारंग), हास्वीरी (आसावरी)

 

बसंत रागाच्या अंगना - देसी (देस), देवगिरी, वैराटी, डीलिका, ललिता, हिंडोली (हिंडोल)

 

हे राग आणि त्यांच्या छत्तीस स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांच्या अंगना अशा रंजक मिश्रणातून सोळा हजार उपराग तयार होतात असं शास्त्रात लिहिलं आहे.

 

आपल्या संगीतामध्ये समयचक्राचं महत्व अनन्यसाधारण असंच आहे. प्रत्येक   

रागाची गाण्याची वेळ नक्की असे. त्यात कोणताही बदल अशक्य असे. गुरूगृही शिकताना रागाबंधन नसलं तरी त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष गायन कार्यक्रमात व्हायचीच. इतकंच नव्हे तर नुसत्या प्रहराप्रमाणेच नव्हे तर त्यातल्या घटिकांप्रमाणे गायनाची वेळ ठरलेली असे. त्याकाळातल्या समयमापनाप्रमाणे एक घटिका म्हणजे २४ मिनिटे. म्हणजेच अडीच घटिकांचा एक तास मोजला जायचा. मोठमोठ्या वाड्यातून, समाजमंदिरांमधून घटिकापात्रे मांडलेली असायची. एकेका तासाचा टोला दिला जायचा. सूर्योदयापासून अस्तापर्यंत आणि सूर्यास्तापासून पुढच्या उदयापर्यंतच्या प्रत्येक घटिकेप्रमाणे रागसमय चक्र नक्की केलेलं होतं. आज ते न्याहाळताना एक वेगळ्या प्रकारचं मनोरंजन होतं. पाहूया घटिकांनुसार रागांच्या वेळा कशा होत्या ते!

 

१.    सूर्योदयापासून पाच घटिकापर्यंतचे राग – भैरव, भैरवी, बंगाली, रामकली, आसावरी, जोगिया, गांधार, भांडारी,

२.    पाच घटिकेपासून दहा घटिकेपर्यंत – बिभास, देवगिरी, कुकुभ, अल्हैया बिलावल, पटमंजरी, सरपरदा, शुक्लबिलावल,   

३.    दहा ते पंधरा घटिकेपर्यंत – सिंधुरा, सिंधू, काफी, शुद्ध तोडी, काफी तोडी, लक्ष्मी तोडी, गुर्जरी, मुदागुर्जरी

४.    पंधरा ते वीस घटिकेपर्यंत – वृन्दावनी सारंग, मदमाद सारंग, सामंत सारंग, पटहंसिका, शुद्ध सारंग

५.    वीस ते चोवीस घटिकेपर्यंत – भीमपलासी, श्री, मुलतानी, सजा, विजय, धानी, धवलश्री 

६.    चोवीस ते अठ्ठावीस घटिकेपर्यंत – धनश्री, मालश्री, पूरिया, पूर्वी, वराटी

७.    अठ्ठावीस घटिका ते सूर्यास्तापर्यंत – श्रीराग, चित्रागौरी त्रिवेणी, मालवा, श्रीटंक, साझगिरी

८.    सूर्यास्तापासून पाच घटिका पर्यंत- तास्विनी, शाम केदारी, (केदार), छायानट, कामोदी.

९.    पाच ते दहा घटिकापर्यंत- कल्याण, शुद्धराग पूरिया, जयजयवंती, भूपाली आणि अन्य राग

१०.दहा ते पंधरा घटिका पर्यंत – शुद्ध कानडा, नायकी कानडा, कौशिकी कानडा, नागध्वनी कानडा, मुद्रा कानडा, रागीश्वरी कानडा, पराज कानडा, हुसेनी कानडा आणि तत्सम

११ पंधरा ते वीस घटिकापर्यंत – बिहाग, विहंग, बेहागडा, विहगडा, देव बिहाग, अरुण बिहाग, संकीर्ण, संपूर्ण टंक, शंकरा, शंकराभरण.

१२ वीस ते पंचवीस घटिका पर्यंत – नटनारायण, केदार नट, आणि तत्सम.

१३ पंचवीस ते एकोणतीस घटिका पर्यंत – मालकंस, हिंडोल, सोहनी

१४ एकोणतीस ते सूर्योदया पर्यंत – ललत आणि तत्सम आधुनिक राग

 

आचार्य विष्णु नारायण भातखंडे यांनी आधुनिक संगीतशास्त्र निर्माण केलं. तत्पूर्वी दक्षिणेतील महान पंडित वेंकटमखी यांनी बहात्तर मेळकर्त्यांची निर्मिती करून राग विभाजन शास्त्रसंमत आणि सोपं केलं. आचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर या थोर संगीतोद्धारक पंडितांनी संगीत शिक्षणशास्त्र निर्माण केलं. त्याचप्रमाणे महमद रझा यांनी श्रुती आणि शुद्धसप्तकासंदर्भात संशोधन केलं. राजा शौरीन्द्र मोहन टागोर यांनी प्राचीन आणि मध्ययुगीन संगीताचा व्यापक इतिहास इंग्रजीतून प्रकाशित केला. याशिवाय या यादीमध्ये असंख्य धुरिणांचा समावेश आहेच!

 

ही माहिती संकलित करतांना मला ‘सर्वसंग्रह’ या प्राचीन संपादित पुस्तकाची मदत झाली. त्याशिवाय माझे मामा (वडील ती. गोविंदराव (बापूराव) हेर्लेकर यांच्या मावशीचे यजमान ती. स्व. विष्णु दामोदर देऊळकर यांचे बंधू माणिकबुवा) यांच्या डायरीतील परिच्छेदांचाही उपयोग झाला आहे. हे दोघेही बंधु त्यांचे गुरु व वडील पंडित दामोदरबुवा देऊळकर यांचे शिष्य होते. दामोदरबुवा हे आद्य माणिकप्रभुंच्या संगीतसेवेत आयुष्यभर राहिले. ते ध्रुपद गायक आणि पखवाजी होते. त्यांच्या हस्ताक्षरातल्या डायऱ्या आजही माझ्या संग्रहात आहेत. त्यात शेकडो पाने संगीतशास्त्र, धृपदे, पखवाजाचे बोल, परण, एवढेच नव्हे तर तरतऱ्हेच्या पाकक्रियांचाही समावेश आहे. आज अत्यंत जीर्ण झालेल्या या डायऱ्या शंभराहून अधिक वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे त्यांना स्पर्श करणेही कठीण आहे, इतक्या त्या नाजूक झाल्या आहेत.

सर्वांच्या अवलोकनासाठी त्यांच्या डायरीची दोन पाने खाली दिली आहेत. पाहून आपल्यालाही छान वाटेल.   

............आणि म्हणूनच १९८१ साली माझ्या संगीतक्लासचं नाव मी श्री दामोदर संगीत विद्यालय असं ठेवलं आहे.

 



नंदन हेर्लेकर