Pages In This Blog

Sunday, October 13, 2024

मात्रिक छंद आणि वर्णिक छंद.

छंदहीनों न शब्दोस्ति न च्छंदश्श्ब्द वर्जितम् | 

नाट्यशास्त्र 

स्वर आणि काल हे ध्वनीचे दोन स्तंभ आहेत. स्वरतत्व संगीतात आणि काव्यात अंतर्भूत असते. तालतत्व ताल आणि छंदात स्पष्ट होऊन ते स्वयंभू प्रकट होतात. ताल आणि छंद याचा हा संबंध इतका जवळचा आहे. स्वरतत्व स्वरांच्या विभिन्न स्वरूपात (जसे स्वरालंकार) आणि कालतत्व लयतालाच्या विभिन्न स्वरूपात (विविध मात्रांचे ताल) सर्वांच्या अनुभवाला येत असते. नियमित अभ्यासकाला याचे प्रत्यंतर नेहमी येत असतेच. गद्य बोलण्यात स्वर आणि काल अनियमित असतात. संगीतात मात्र ते नियमबद्ध स्वरूपात प्रकट होत असतात. काव्यात छंदाचे महत्त्व दिसते आणि संगीतात तालाचे. म्हणूनच प्रत्येक संगीतरचना तालबद्ध असते आणि प्रत्येक कविता छंदोबद्ध असते. (मुक्तछंद हा प्रकार वेगळा, तो विषय येथे नाही!!) छंद काव्याचा आणि ताल संगीताचा मापक म्हणून प्रकट होतो. भरतमुनींनी व्यापक रुपात स्वरतत्व शब्दात आणि कालतत्व छंदात सांगून दोन्ही अभिन्न असल्याचे सांगितले आहे. तालाने संगीत अनुशासित बनत असते तर छंदाने काव्य अनुशासित बनत असते. छंदाचे दोन प्रकार भरतमुनींनी सांगितले आहेत. मात्रिक छंद आणि वर्णिक छंद. मात्रांवर आधारित छंद हे मात्रिक आणि वर्णांवर आधारित हे वर्णिक म्हटले जातात. म्हणजेच ह्रस्व - दीर्घ किंवा लघु - गुरु या आधारावर लयीला विशेष आकार स्वरूप प्राप्त होत असते. तेव्हाच त्याला छंद म्हटले जाते. लयबद्धता हीच त्याची विशेषता असते. 

अर्थसंपन्न काव्यामध्ये जशी लयबद्धता असते तशीच ती निरर्थक काव्यामध्येही (या ठिकाणी निरर्थक म्हणजे अर्थाची अपेक्षा नसलेले काव्य) असते, शब्दरहित रचनेमध्येसुद्धा असते. (जसा तराना). उत्तर भारतीय साहित्यात चौपाई, दोहा, हरिगीतिका, रोला, छप्पय, कुंडलिया हे मात्रिक छंद गणले जातात, तर मालिका, मंदक्रांता, तोडक, धनाक्षरी, सवैय्या हे वर्णिक छंद आहेत. छंदाला लयबद्धता असणे महत्त्वाचे. त्यात सार्थक रचना किंवा निरर्थक रचनाही असू शकते. स्वर आणि ताल हे संगीताचे दोन अनन्यसाधारण घटक आहेत. याचबरोबर गायनामध्ये तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कविता असते. 

कविता वाचन हे स्वतंत्र रूपाने छंदाची अनुभूती देते पण तिचे गायन होते तेव्हा त्यातला मूळ छंद लुप्त होऊ शकतो आणि तिच्यातून नव्या तालछंदाची अनुभूती यायला लागते. मग ती रूपक, दादरा, तीनताल, अथवा कोणत्याही तालात गाता येते, आवश्यकतेनुसार ह्रस्व, दीर्घ, छोटे, मोठे उच्चार तयार होतात. उपयोगात आणलेल्या तालाचा नवा छंद निर्माण होतो. म्हणजेच ज्या तालात कविता गावी तो तचा छंद बनतो. 

धृपदगायनापूर्वी प्रबंध होते, ते छंदोबद्ध होते. तोटक, दंडक, झंपट, सिंहपद, गाथा, आर्या असे प्रबंध आपल्या नावामधल्या छंदात गायले जात. प्रबंधामध्ये याशिवाय इतरही अनेक छंद होते. कवि जयदेवाच्या गीतगोविंदमध्ये अनेक छंदांचा उपयोग झाला आहे. संगीत आणि काव्य या दोन्हींचा त्यात कल्पक समावेश आहे. परंतु प्रबंध गायनामधली अत्याधिक लांबलचक पदे, त्यांचं असाधारण महत्त्व, पदांची क्लिष्टता, काव्यगुणापेक्षा स्वरतत्वावरील अधिक परिवर्तन आदि कारणामुळे त्यांची जागा धृपद गायनाने घेतली. प्रबंधाच्या तुलनेत धृपद गायनातली संक्षिप्तता, सरलता, पद आणि तालांची विभिन्नता, गेयता यामुळे धृपद गायनाचा राजदरबारात प्रवेश सहज झाला. धनाक्षरी छंदाचा उपयोग धृपदात परिवर्तीत झाला, म्हणजेच चारतालात झाला. त्यात 31-31 अक्षरांचे 4 चरण धृपदात रचले गेले. त्याचेच स्थायी, अंतरा, संचारी आणि आभोग बनले. धनाक्षरीचे परिवर्तन चारतालमध्ये होण्यासाठी बरेच बदल करावे लागले. परंतु यातली सगळीच पदे परिवर्तीत झाली नाहीत. ती मूळ स्थितीत तशीच गायली गेली. 

धृपदानंतर शास्त्रीय संगीत क्षेत्रात प्रविष्ट झालेल्या ख्याल संगीतात गायली गेलेली पदे मूळ छन्दांशी बहुधा फारकत घेतानाच दिसतात. बडा ख्याल गाताना मुळातल्या कवितेच्या छंदाला छेद जातो, तो कधीकधी नष्ट होतो, शब्दांची खेचाखेच करून, कधी हृस्वाचे दीर्घ, तर दीर्घाचे ह्रस्व करून, कित्येकदा शब्द्श्चेद करून, ते अर्थविहीन करून ते कसेही गायले जातात. मूळ कवितेत छानसा छंद असला तरी एकतर तो नष्ट होतो, नाहीतर तो व्यवस्थित अनुभवला जात नाही. स्वर अलंकार छंदोबद्ध असतात, पण त्यांचा उपयोग केला जात नाही, त्याच्या स्वररचना तालबद्ध करून सादर केल्या जात नाहीत. त्यात सुंदर छंद असतात पण पूर्णपणे दुर्लक्षित असतात. 

वानगीदाखल काही उदाहरणे पाहू. 

मात्रिक गण 

१. सरेग s रेगम s गमप s मपध s पधनी s धनीसां s चिन्हे - IIS लघु लघु गुरू (स गण) 

२. सारेसा रेगरे गमग मपम पधप धनीध नीसांनी चिन्हे - III लघु लघु लघु (न गण) 

३. साSसासा रेSरेरे गSगग मSमम पSपप धSधध नीSनीनी सां Sसांसां चिन्हे - SII गुरू लघु लघु (भ गण) 

४. सारेSग रेगSम गमSप मपSध पधSनी धनीSसां चिन्हे - ISI लघु गुरू लघु (ज गण) 

५. रेSसारेS गSरेगS मSगमS पSमपS धSपधS नीSधनीS चिन्हे - SIS गुरू लघु गुरू(र गण) 

वर्णिक गण 

१. सारेसा रेगरे गमग मपम पधप धनीध नीसांनी - त्रिमात्रिक 

२. सारेगरे रेगमग गमपम मपधप पधनीध धनीसांनी - चातुर्मात्रिक 

३. सारेगरेसा रेगमगरे गमपमग मपधपम पधनीधप धनीसांनीध - पंचमात्रिक 

तसे षष्ठमात्रिक, सप्तमात्रिक वगैरे अलंकार बनले.