Pages In This Blog

Friday, January 15, 2016

"Ache Din"....but whose?

संगीतातले ’अच्छे दिन’....पण कुणाचे?

आज काल जो तो म्हणतो की संगीतसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. खरेच आहे का हो ते?

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एक दिसणारी आणि एक न दिसणारी. दिसणाय्रा बाजूबद्दल सगळॆच बोलतात कारण ते दर्शनी सत्य असते. दुमत असण्याचा प्रश्नच नसतो मुळी. एखाद्या स्पर्धेत कुणी प्रथम तीन क्रमांकात आले की तो/ती लागलीच वाखाणण्यायोग्य होतातच ! गुणवत्त्ता ही सिध्द होत असतेच. कुणी त्यावर समजा आक्षेप घेतलाच तर त्या व्यक्तीचाच काही स्वार्थ लपला आहे की काय अशी शंका घेतली जाते.

या गुणवत्तेला आपण ग्राह्य धरले तर किती तरी नव्या गायक/गायिकांचा व्यवसायिक क्षेत्रात प्रवेश व्हायला हवा. पण प्रत्यक्षात संगीतसृष्टीत उच्चपातळीवर पोचणाय्रांची संख्या अगदीच नाममात्र प्रमाणात वाढत असते. असे का असावे बरे?

वरील विचार भारतीय शास्त्रीय संगीताच्या उच्च पातळीवरुन करण्याचा आहे. ही उच्च पातळी म्हणजे स्वरप्रधान गायकीचा ध्यास घेणाय्रा कलावंतांच्या जडण घडणीची आहे. जिथे ’घरंदाजी’ आहे तिथे नव्या कलाकाराची उपज आहे असा सर्वसामान्य भाव असतो. पण आज आश्चर्याची गोष्ट ही आहे की नवा अंकुर संगीताच्या भावपक्षाकडे कमी झुकतो आहे. याचा प्रत्यय प्रत्येक सुसंस्कृत ठिकाणी दुर्दैवाने  येतो आहे.

शास्त्रीय संगीताचा मूळ भाव शब्दरहित विस्ताराचा आहे. त्यावर बंदिशीचा आकर्षक मुखडा, शब्दांची नजाकतदार बांधणी, लयीशी झोकदारपणे मांडलेला खेळ आणि स्थायी-अंतय्राचा मेलमिलाफ रचुन श्रोत्यांसमोर मांडून झाला की काम संपले ! पुढे रागविस्ताराचे काम आलाप, तान विविधांगाने मांडत राहणे यात असते. रागाचे अमूर्तत्व व्यक्त होण्यासाठी कलावंताला तनमनपूर्वक कलेशी ईमान राखून स्वतःला बराच काळ ’अव्यक्त’ ठेवावे लागते.

यात खरी गोम ती इथेच आहे. लौकर ’व्यक्त’ होण्याची हौस कलेच्या उत्कर्षाला मारक होत असते हा सर्वसाधारणपणे सिद्ध झालेला नियम आहे. बालकलाकार म्हणून होणारे कौतुक अंगभूत गुणांना ’पुढे’ आणण्याचे काम करते खरे , पण अप्रकट असणारे, कदाचित अधिक प्रभावशाली गुण कायमचेच दडपून टाकते हे ही अनेकांच्या बाबतीत खरे ठरले आहे.

कुमार गंधर्वांचे श्रेष्ठत्व निर्विवादपणे जगासमोर आले ते केवळ देवधरांच्या दूरदॄष्टिमुळे. कुमारांच्या अतिसूक्ष्म स्वरदृष्टीला देवधरांनी सावधान केले. बालवयात ऐकलेल्या प्रत्येक ग्रामोफोन रेकॊर्डची हुबेहूब प्रतिकृति कुमारजी उभी करत. इतकेच नव्हे तर त्या रेकॊर्डच्याही पलिकडे जाऊन मूळ गायकाच्या मनोभूमिकेत ते जाऊन पुढे गाऊन दाखवीत. तरीपण देवधरांची कुमारांकडे, त्यांच्या संगीतशक्तीकडे पाहण्याची दृष्टी विलक्षण कठोर होती असे नक्कीच म्हणावे लागेल. कारण (सवंग) लोकप्रियतेच्या मखमली काट्याना त्यानी लौकर दूर केले. म्हणूनच कुमारांची गायकी सर्व बंधने ओलांडून मुक्त झाली. रानोमाळ उन्मुक्तपणे भिरभिरणाय्रा वादळ्वाय्राप्रमाणे फुललीच फुलली. असामान्य प्रतिभेने संगीताला नवी दिशा देणारी त्यांची स्वरप्रवृत्ति केवळ त्याना वेळेवर दॄष्टी मिळाल्याचा परिणाम आहे. अर्थात शारीरिक अस्वास्थ्यामुळे विकल झालेल्या शरीराला माळव्याच्या लोकधुनींनी मानसिक उभारी दिली आणि त्यांच्या अंतर्मनातल्या स्वरधारानी नवा साज शृंगार केला हा त्यापुढचा इतिहास आहे.

हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रात सध्याच्या काळात आणखी एक तळपणारा तेजस्वी तारा म्हणजे आनंद गंधर्व अर्थात आनंद भाटे. बालवयात बालगंधर्वांची अवघड पण अचंबित करणारी गायकी आत्मविश्वासाने चोखंदळ श्रोत्यांसमोर गाऊन रसिकांचा कंठमणि बनलेल्या भाटे यानीही पुढे बराच काळ ’अव्यक्त’ राहून भीमसेनजींच्या गुरुत्वात राहून स्वतःस पूर्ण तयारीने ’व्यक्त’ केले. ’घराणेदार’ गायकीतून (पणजोबा सुप्रसिद्ध भाटेबुवा ) ’अभ्यासाचेनि प्रकट’ झालेले हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे.

वर उल्लेखिलेली दोनही उदाहरणे वेगवेगळ्या कालखंडातली असली तरी त्यातला स्थायीभाव तोच आहे. त्यांच्यातला समान धागा हा अंगभूत गुणाची उत्तमतेने केलेली जोपासना आणि त्यांच्या स्वयंस्फूर्तिला मिळालेले भावकवच हा होय.

हे सर्व याचसाठी की आज छोट्या-मोठ्या स्पर्धांतून किंवा टीव्ही चैनलवरुन लहान मुलांचा सहभाग खूप असतो. त्यांना मिळणारी बक्षिसे आणि इतर प्रलोभने त्यांना क्षणार्धात ’स्टार’ बनवीत असतात. त्या स्पर्धांचा विषय संपल्यानंतर कितीजणानी शास्त्रीय संगीताच्या व्यवसायाची कास धरली आहे हे पाहणे एक अभ्यासाचा विषय ठरेल. झटपट कलाकार बनल्यानंतर परिश्रमाची पराकाष्ठा करुन परंपरा सांभाळण्याचा ’अट्टाहास’ कोण करेल बरे?

नंदन हेर्लेकर


nandanherlekar@gmail.com