Pages In This Blog

Sunday, January 24, 2021

स्वरादित्याचे आवर्तन स्तब्ध !!!

 स्वरादित्याचे आवर्तन स्तब्ध 

हा लेख भारतरत्न पंडित भीमसेनजी गेले तेव्हा बेळगावच्या ''तरुण भारत'' मध्ये लिहिला होता. 

मला वाटते 'त्या' दिवसाच्या या लिखाणाच्या प्रयोजनामध्ये आणि आजच्या घडीला हे पुनः प्रसिद्ध करण्याच्या प्रयोजनामध्ये तसा काहीच फरक नाही आहे.   

             हिंदुस्थानी संगीताचा तळपता सूर्य असे ज्यांचे थोड्याच शब्दात वर्णन करता येईल असे "खरोखरीचे" भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे देहावसान अवघ्या संगीत सृष्टीला मोठाच हादरा देणारे आहे. वयाची सरणारी पाने उलगडत असताही त्यांचा हिशेब न ठेवणारे हे असामान्य व्यक्तिमत्व वयाच्या ८६व्या वर्षांपर्यंत अखंडितपणे गात राहिले. 'मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा' हा एकात्मतेचा संदेश दूरदर्शन च्या माध्यमातून त्यांनी दिला. त्याहीपूर्वी अनंत काळापासून स्वरधारेच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गौरवशाली भारतीय संगीताच्या महान चक्रवर्तीचा वारसा त्यांनी आपल्या स्वरशक्तीने त्रिलोकात गर्जविता ठेवला. भीमसेन या नावाला शोभेल अशी त्यांची स्वर शक्ती होती. 'भाव भक्ती भीमा उदक से वाहे' ही पंक्ती म्हणत असताना त्यांच्या उच्चारण शक्तीमुळे स्वर शक्तीही उत्तुन्गतेचे शिखर गाठायची. त्यांचा 'षडज' सप्तस्वरांची उत्पत्ती करून देण्याच्या आपल्या व्याख्येपलीकडे जाणारी एक अमोघ प्रवृत्ती होती. घरंदाजी गायकीचा रसपूर्ण प्रवास त्यांच्या स्वतःच्या स्वरविलासामुळे 'किराना' परंपरेच्या अत्युच्च शिखरावर पोचला.




              तसे पाहता त्यांच्यावर बालपणी असलेला उ. अब्दुल करीम खान साहेबांच्या गायकीचा प्रभाव सवाई गंधर्वांच्या कडून मिळालेल्या तालमीतून अधिक प्रखर झाला. त्यांची विलम्पत ही किराना घराण्याच्या सर्व बारकाईचा ठाव घेणारी होती. पण गगनाचा ठाव घेणाऱ्या अतितार स्वरावरील फिरत, विद्युल्लतेच्या वेगाने तिन्ही सप्तकांतून अविरत कोसळणारी त्यांची 'भीमसेनी' तान आणि मध्य लयीच्या पाच-पाच आवर्तनांची त्यांची न थांबलेली तानक्रिया हे सारे किराना परंपरेत कुठेही न दिसणारे त्यांचे स्वतःचे धन होते. अशा अजस्र तानक्रियेत त्यांचा श्वास 'नेमका' कुठे येतो हे अचंबित श्रोत्या पुढचे मोठेच प्रश्नचिन्ह असे.
              वैदिक काळखंडामध्ये 'आसेतु हिमाचल' भारतीय संगीत शास्त्र वैभवाप्रत गेले. भरत, कश्यप, मातंग अशा महा मुनिपासून कोहल, दत्तील, वेण, नान्यभूपाल, भोज, सोमेश, अभिनव गुप्त, लोल्लत, उद्भट, शारंगदेव असे महान शास्त्रकार संगीतशास्त्राचा परमोद्धार करून गेले. संगीतशास्त्राला देवत्व प्राप्त झाले. ते भक्तिमार्गाचे मोठेच साधन बनले. पण बाराव्या शतकानंतर  संगीताची कांही दृष्ट्या अधोगती सुरु झाली. शास्त्राचा ह्रास होऊ लागला. संगीताचे देवस्थान नष्ट झाले. कला राज घराणी आणि सरदार-दरक्दारांची बटिक बनली. एकोणिसाव्या शतकाच्या अंतापर्यंत ही  स्थिती अशीच राहिली. कलावंत व्यसनी, रंगीले, लहरी आणि व्यावहारिकदृष्ट्या कफल्लक राहिले, परमोच्च संगीतगुण असणारे ज्ञानी गुरु शास्त्र विसरले. अशा काळात कलेला आणि शास्त्राला पुनर्वैभव प्राप्त करून दिले ते 'विष्णू द्वयानी', म्हणजेच विष्णू नारायण भातखंडे आणि विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी. संगीताचे नवे युग सुरु झाले. 

              याच काळात पं. भीमसेन जोशींच्या रूपाने एक ध्रुव तारा अवतीर्ण झाला. त्यांचे स्थान केवळ प्रसिद्ध गवई म्हणून नव्हे तर मैफिलीच्या बाबतीत एकमेवाद्वितीय स्वरनायक म्हणून त्यांची ख्याती देश-विदेशात झाली. सहा-सहा महिने त्यांचे advance बुकिंग नेहमीच असे. आजच्या काळात ज्याला 'लीजींड' म्हणता येईल असे हे चिरतरुण व्यक्तिमत्व होते. भाषा, प्रांत, देश, धर्म, समाज रूढी आणि सर्व तथाकथित राजकीय, आंतरराष्ट्रीय बंधने या सर्व मर्यादा पार करून सात समुद्रपार गेलेले हे अस व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. कंठात अक्षय स्वरांचा खजिना साठवलेला आणि उत्कंठीत श्रोत्यांच्या तना-मनावर उदारपणे उधळलेला तो एका अजब चमत्कार होता. त्यांचे गायन ऐकून बाळांचे तरुण आणि तरुणांचे वृद्ध झालेले श्रोते लक्षावधी असतील. पण त्यांचे स्वरदेणे कधीच विद्ध झाले नाही.
                      त्यांची कोणतीच मैफल कधीच म्लान झाली नाही हा ही एक चमत्कारच. त्यांच्यावर अनेकांनी अनेकवेळा सातत्याने स्तुतिसुमने उधळली. अनेकांनी टीकाही केल्या. त्यामुळे त्यांचे कधी अडले नाही व कधी ते फुशारकीने हुरळूनही गेले नाहीत. 'आज मूड लागत नाहीचाही त्यांनी कधी आधार घेतल्याचे ऐकिवात नाही.

त्यांचा संचार आणि संपर्क अफाट होता. त्या संपर्काला त्यांच्यातील देवत्वाचा स्पर्श होता. त्यामुळेच त्यांच्यातील सघटन कौशल्य सवाई गंधर्व संगीतोत्सावाच्या आयोजनात दिसले. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या श्रोत्यांमध्ये त्यांच्या प्रभावळीचा दरारा असे. आयोजनात कुठेही ढिसाळपणा नसे  व तक्रारीला जागा नसे. आज जागोजागी होणारी संगीत संमेलने ते उदाहरण समोर ठेवूनच आयोजिली जातात. त्याहून पुढे जाऊन म्हणायचे तर 'सवाई गंधर्व महोत्सवात गायला मिळावे' ही उत्कट प्रेरणा नवकलाकाराच्या मनी यावी असे ते महा मेळ्याचे स्वरूप केवळ त्यांच्यामुळेच बनले. 'हिंदुस्थानी संगीतात मुसलमानी कलावंतांचे वर्चस्व आहेअसे म्हणत असतानाच "हिन्दुओ में क्या, मुसलामानो में भी ऐसा गवय्या नही है" असे उद्गार काही ठराविकच गवयासाठी मोठमोठ्या उस्तादांनी काढले. आजच्या काळात भीमसेनजींचे नाव त्या यादीत अग्रस्थानीच होते. 

            गायकी आणि  नायकी या दोन्हीमध्ये त्यांचे संगीतमूल्य अतिश्रेष्ठच होते. संगीतनिर्मितीही त्यांनी केली. 'धन्य ते गायनी कला' यासारख्या नाटकांना त्यांनी दिलेल्या चाली घरंदाजी गायनाचा परिचय करून देणाऱ्या आहेत. 'हे करुणाकरा ईश्वरा कृपादान मज दे' हे गीत 'मारवा' समजण्यासाठीचे एक उत्कट पण अवघड उदाहरण आहे. मराठी संतवाणीकन्नड दासरपदगळू ही तर प्रसिद्ध आहेतच, पण त्यांनी गायिलेली कबिरांची, तुलसीदासांची, ब्रह्मानंदाची तसेच अनेक नवीन कवींची हिंदी पडे न मोजता येण्याइतकी आहेत. लता मंगेशकरांसह म्हटलेली पं. नरेंद्र शर्मांची त्यांची हिंदी पदे अतिशय लोकप्रिय आहेत.
            पंडित भीमसेन जोशी हे नाव संगीतकलेच्या भाव विश्वात नित्यच राहील. संगीतात रमणाऱ्या, त्या अमर्याद सुरसागरात आत्मानंद मिळवू पाहणाऱ्या रसिकांना हे प्रातः स्मरणीय राहील, पिढ्यानपिढ्या ही स्वरनौका संत्रस्त जनांना सुखवीत राहील, स्वरमयी कलावंतास प्रेरक राहील.


नंदन हेर्लेकर