साथ संगत म्हणजे काय?
सामान्य श्रोता गायन वादन कार्यक्रमात
आवश्यक असणाऱ्या तबलासाथीबद्दल खूप औत्सुक्य बाळगून असतो. विशेष करून तडफदार तान, दमदार आलापी, आणि भरदार स्वर असलेल्या
गायनाकरिता उचित तबला साथ असावी लागते. ही ‘उचित’ तबलासाथ कशी असते हे पाहणे देखिल
अत्यंत मनोरंजक ठरेल. उसळत्या समुद्राच्या लाटा काळ्याकभिन्न कातळावर धडका मारीत आहेत,
असे रौद्र स्वरूप कॅनव्हासवर प्रभावीपणे चितारल्यावर अर्ध्या इंचाची अनाकर्षक पट्टी
असलेली फ्रेम शोभून दिसेल का? तसेच आहे ‘उचित’ तबलासाथीचे महत्व!
मुख्य गायक किंवा स्वरवाद्यवादक
आणि तालवाद्यावर त्याला साथ देणाऱ्याच्या मनोमीलनाचे ते प्रत्यक्षदर्शी स्वरूप आहे.
याठिकाणी तंतुवाद्याची साथ करणाऱ्या तबल्याचे स्थान पाहणेही योग्य ठरेल. सतार-सरोद
यासारख्या वाद्यांमध्ये सातत्याने होत असलेली कामगत लयीच्या बरोबरीने आणि वेगवेगळ्या
पटीने उमलत असताना ऐकणे हा अत्यानंदाचा भाग आहे. अभ्यासू श्रोत्याच्या मनोवृत्तीच्याही
पलीकडे जाणाऱ्या या तबलियाची ग्रहणशक्ती असावी लागते.
तसे पाहता साथ आणि संगत हे भिन्न
शब्द आहेत. साथ ही गायनाच्या, वादनाच्या लयीप्रमाणे ठेक्याची योजना करून,
त्याबरहुकुम ठेका धरणे ही जर साथ मानली तर ठेक्याकडे पाहत पाहत गायन करण्याची सवय असणाऱ्या
कलाकाराबरोबर तबलासाथ करणे ही तर कसरतच मानावी लागेल. तय्यार गायक-वादकांबरोबर केवळ
ठेका धरून राहणाऱ्या तबलियाचे ‘पात्रत्व’ही असेच असेल. कमी ग्रहणशक्ती, कमी रियाझ,
कमी कल्पनाशक्ती अशा सर्व आघाड्यांवर ‘कमी’पणा अशा तबलावादकास श्रोताभिमुख बनण्यास
मारक ठरतो. प्रसंगी त्याचे हे रूप अन्य योग्य तबलावादकाच्या अनुपलब्धतेमुळे जास्तच
उघडे पडते.
याउलट संगत करणारा तबलावादक गायन-वादन
कलेचा अथांग सागर पार करू पाहणाऱ्या मनोवृत्तीचा असतो. संगीतकलेतील सर्व ज्ञात बारकावे
त्याला अवगत असतात. त्यामुळे तशा तबलियाला उत्तम गुण आणि प्रचंड रियाझ असणाऱ्या गायक-वादकांबरोबर
आपली कला सादर करण्यात अपार आनंद मिळत असतो. संगीतकलेचे जे अंतिम ध्येय –
मोक्षप्राप्ती याकडे त्याचा त्याला नकळत प्रवास चालू असतो. असा तबलावादक कलाकार खूप
मोठ्या मनाचा असावा लागतो. स्वार्थ परित्याग त्याच्या ठिकाणी वसलेला असतो. अशा प्रसंगी
मुख्य गायक-वादकाबरोबरीने कलेचे अत्युच्च शिखर गाठण्याची इच्छाच त्याची प्रेरणा बनते.
हे झाले उत्कृष्ट कलाकारांबाबत.
साधारण प्रतीच्या गायक-वादकांबरोबर त्याला कसोशीचे मनोबंधन पाळावे लागते.
कित्येकदा त्याच्या स्वत:च्या प्रतिभेवर कार्यक्रम तारून न्यावा लागतो. त्याला त्यावेळी
प्रथम स्थानाची अपेक्षाही नसते. मोठ्या प्रमाणावर संधी असूनही आपले प्रभुत्व तो अशा
ठिकाणी प्रकट करत नाही.
कित्येक प्रसंगी मात्रा मोजत गाणाऱ्या,
ठेक्याकडे पाहत वाजविणाऱ्या कलाकारांसोबत त्याला वाजवावे लागते, तेव्हा त्याला मनाला
न पटणाऱ्या तडजोडीही कराव्या लागत असतात. याठिकाणी नेहमी ‘साथ’ करणाऱ्या तबलियाच्या
अनुपलब्धतेमुळे त्याला ही भूमिका निभावून न्यावी लागत असते. पण हेही खरे आहे की अस्सलतेचा
स्पर्श लाभलेल्यांची संगत त्याला कमी प्रसंगी लाभत असल्यास त्यांचा शोध घेण्यास त्याला
बाहेर पडावे लागते. तशा ठिकाणी त्याच्या प्रतिभेला योग्य न्याय मिळत जातो.
वर एका ठिकाणी ‘केवळ ठेका वाजवीत
राहणे ही साथ’ असे म्हटले गेले आहे. या संदर्भात कांही उदाहरणावरून असे दाखविता येईल
की केवळ ठेका वाजवून कांही तबलियांनी अर्थपूर्ण संगत केली आहे. हृदयातील खोलीपर्यंत
स्वर पोहोचविणारे आणि एकेका स्वराला पैलुदारपणे अनेक संदर्भ देणारे गंभीररस स्वरसम्राट
उस्ताद अमीरखां यांच्या संथ गायनाला लाभलेली उस्ताद महमद अहमद यांनी दिलेली तबला संगत
अवश्य ऐका. याचप्रमाणे प्रश्नचिन्हांकित गायकीचे रसज्ञ पं. कुमार गंधर्व यांच्याबरोबर
अधिकाधिक प्रसंगी तबलावादन केलेले पं. वसंतराव आचरेकर ही दोन उदाहरणे केवळ ठेक्याचे
वजन पेलू शकणाऱ्या आणि लयीचा सखोल ठाव घेऊ पाहणाऱ्या श्रेष्ठ तबलावादकांपैकी आहेत.
विलंबित झुमरा, आडा चौताल, विलंबित तीनताल असे नुसते ठेके त्यांच्या गायनाकरिता वाजविले
गेले आहेत. सुदैवाने युट्युबवर किंवा रेकॉर्ड्सद्वारे आज आपण ते ऐकू शकतो.
सतार, सरोद, संतूर यांसारख्या तंतुवादकांबरोबरची
तबलासाथ गायकीच्या साथीहून खूप वेगळी आहे. या तंतकारांच्या सादरीकरणामध्ये प्रथम आलाप,
जोड व झाला असतो आणि बहुधा विलंबित तीनतालामध्ये आणि क्वचित रूपक अथवा झपतालामध्ये
गत वाजविली जाते. या वाद्यांबरोबर होत असलेली तबलासाथ हा एक वेगळाच विषय आहे. गत सुरु
होताच समेवर उठान घेऊन तीनचार आवर्तनाचे गत परन अथवा तत्सम जोमदार बोल तबलावादक वाजवीत
असतो आणि आकर्षक रीतीने तिहाई घेऊन पेचदारपणे समेवर येत असतो. त्याच्या बहारदार वादनाने
सर्वसामान्य श्रोता आनंदविभोर होऊन जातो. तोवर मुख्य तंतकार मूळ गतीचीच आवर्तने लहऱ्याप्रमाणे
वाजवीत असतो. पुढे लयकारीच्या अंदाजाने बढत सुरु होते आणि सुंदर हरकती, तिहाया, चक्करदार
तोडे वाजवीत वादक समेवर येतो.
प्रतिभावंत तबलावादक अशावेळी आपले
कौशल्य, बुद्धि पणाला लावून ठेक्याला मुख्य तंतकाराच्या लयकारीशी पूरकरीतीने नटवून,
सजवून, लयकारीच्या हाकेला साजेसे उत्तर देत जवाबी हरकती पेश करत असतो. पुढेपुढे द्रुत
लयीमध्ये होणारे सवाल-जवाबही रंजक आणि आव्हानात्मक असतात. अभ्यासू श्रोताही अशावेळी
विस्मयचकित होत असतो. समसमा संयोग साधणारे दर्जेदार कलावंत स्वत:चे स्वतंत्र विश्व
निर्माण करून त्यामध्ये श्रोत्याला जाणीव-नेणिवेच्या पलीकडे नेत असतात. ऐहिक सुखाचा
पूर्णपणे विसर पाडून कर्णाद्वारे स्वरांचे घटच्या घट त्यांना अतीव समाधानाचा अनुभव
देत असतात.
पुष्कळ तबलावादकांना नेहमी असा अनुभव
येत असतो की गायकाने ख्याल सुरु करताच त्याने सुचवलेला ठेका समेवर सुरु केल्यानंतर
पुढे आवर्तन पूर्ण होईपर्यंत मात्रा आणि ख्यालातले शब्द यांचे माप कमी-जास्त होत असते.
नंतर समेवर येत असताना काहीतरी करून सम साधण्याचे तंत्र उपयोगात आणले जाते. यात डोकावून
पाहिले असता दोन गोष्टी लक्षात येतील. एक म्हणजे गायकाला ठेका अवगत असला तरी लयीचे
यथायोग्य माप तबलावादकाला सांगता आलेले नसते. दुसरी गोष्ट याउलट म्हणजे तबलियाने केवळ
ताल कोणता तेवढेच ऐकलेले असते आणि चीजेची लय कशी आहे ते त्याला कळलेले नसते,
किंबहुना गायकाने सांगितलेल्या लयीशी त्याचे संधान साधले गेलेले नसते.
याबद्दल हिंदुस्तानी ख्यालगायन पद्धतींमधील
काही महत्वाच्या गायनशैली अवलोकिल्या तर लक्षात येईल की कोणतीही चीज असो, गायक ख्यालाची
लय साधारणपणे अति विलंबितच ठेवतात. विशेष करून धीमा एकताल या मंडळींचा आवडता ताल आहे
आणि लयीचा मापदंडही ठरलेला असतो. अशा वातावरणात वाढलेल्या तबलियाला ख्यालाची साथ करीत
असताना कुणाहीबरोबर त्याच लयीत सुरुवात करणे अंगवळणी पडलेले असते. गायक जर त्या लयीत
सर्रास न गाणारा असेल त्याला ते अति विलंबित वजन पेलवतेच असे नाही. त्या लयीत त्याला
समरस होण्यासाठी ख्यालाचा बराच काळ ओढून काढावा लागत असतो. तबलियाला अशा लयीत फार फरक
करणेही सवयीचे नसते. वेगवेगळ्या लयीत वेगवेगळ्या बंदिशी असतात हे कधी त्याने लक्षात
घेतलेलेच नसते. त्याला इतकेच माहित असते की ख्यालाची स्थायी, तिचा पूर्ण विस्तार,
आकार-इकार इत्यादी पद्धतीने लावलेला दीर्घोच्चारित तार षड्ज आणि त्यानंतर अंतरा; अशी
पार्श्वभूमी तयार झाल्यानंतर केवळ समेवर येणारा शब्दोच्चार , मग शक्य तेवढा अंतऱ्याचा
विस्तार करून अंतरा पूर्ण म्हणून झाल्यावर स्थायीचा पुनरुच्चार केल्याबरोबर प्रचलित
विलंबित लयीची गाणाऱ्याला न विचारताच बरोबर दुगुन करणे. यांत्रिकपणे त्याचा हा व्यवहार
त्याच्या अंगवळणी पडून गेलेला असतो. अशा तबलियाच्या मनातील ख्यालाचे तयार झालेले प्रतिबिंब
अगदी कधीतरी बदलते. त्यामुळे अशा लयीची सवय नसलेला गायक प्रारंभी दर्शविल्याप्रमाणे
मोहरून गाऊ शकत नाही.
वर विस्ताराने दाखवलेली ही वादनशैली
काही ठराविक भागातच आहे असे नाही. अखिल हिंदुस्तानात सर्व तऱ्हेची गायकी एकच शहरात
ऐकायला मिळेल अशी खूप कमी ठिकाणे आहेत. ज्यावेळी वेगवेगळ्या शैलींच्या गायक-वादकांबरोबर
तबलावादक आपला ताळेबंद जमवेल त्यावेळी त्याची नजर चौफेर होऊन ज्याला जशी लय हवी तशी
तो देऊ शकेल.
आज तबला शिकवणारे वर्ग प्रत्येक
शहरात अमाप आहेत. केवळ कलेवर गुजराण करणाऱ्यांचे ‘बरे दिवस’ आले आहेत असे समाधानाने
म्हणण्यास काही हरकत नाही. या गुरुमंडळीनी कायदे, रेले, परण, तोडे, चक्रदार गती
आणि द्रुतलयीतल्या दमदार-बेदम बंदिशी शिकवतच विलंबित गायन, मध्यलयीतले ख्याल, जयपूर,
आग्रा, ग्वाल्हेर आदि गायकीची खास वैशिष्ट्ये समजावून, त्यांना साजेसे ठेके
विद्यार्थ्यांकडून संयमाने करवून घेतले पाहिजेत. भरपूर गायन-वादन ऐकवले पाहिजे.
रोजच्या बैठकीतच ख्यालाची साथसंगत करण्याचे प्रत्यक्ष धडे दिले पाहिजेत. संगीत
संमेलनामध्ये हजेरी लावून ऐकण्याची सक्ती केली पाहिजे. यातूनच मैफिलीचे कलाकार
घडणार आहेत हे स्पष्ट आहे.
नंदन हेर्लेकर
No comments:
Post a Comment